उद्योजकाच्या घरावर दरोडा; आठ किलो सोने, ४० किलो चांदी लुटली   

छत्रपती संभाजीनगर : परदेशात गेलेल्या उद्योजकाच्या घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी आठ किलो सोने आणि ४० किलो चांदी घेऊन पोबारा केला. गुरूवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहत परिसरात ही घटना घडली. 
 
संतोष लड्डा हे वाळूज एमआयडीसीमधील ‘दिशा ऑटो कॉम्प्स’ या कंपनीचे मालक असून, ८ मे रोजी ते कुटुंबासह परदेशात गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत बंगल्याची देखरेख चालक संजय झळके करत होते. गुरुवारी पहाटे काही दरोडेखोरांनी झळके यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांचे हात-पाय बांधले आणि तोंडाला टेप लावली. त्यानंतर त्यांनी घरातील तिजोरी फोडून मौल्यवान ऐवज चोरून नेला. सकाळी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चोरीचा संपूर्ण प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. 
 
दरोडेखोरांनी घरातील ८ कोटी रुपये किमतीचे ८ किलो सोने व ४० किलो चांदी पळवून नेली आहे. दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिस, ठसे तज्ज्ञ व श्वान पथकासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल  झाले. पोलिसांनी पंचनामा करून अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पुढील तपासादरम्यान पोलिसांना घरातच दोन ते अडीच किलो सोने आणि आठ ते नऊ किलो चांदी आढळून आल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून समजते.
 

Related Articles